आई तू माझीयेश ना???

-
nutan bars

अनन्या ५-६ वर्षाची मुलगी, थोड्या रुसलेल्या आवाजात….


आई! ए आई..! किती हाका मारू गं, कुठे आहेस तू? उठले ना मी…. का गेलीस तू खाली? ये लवकर…. घे मला…. जा बाई तू नाहीयेश माझी…


तर आई म्हणते कशी अहाहा, म्हणे तू नाहीयेस माझी. लगेच मला जवळ घेते आणि म्हणते ये गं माझं गोडूलं ते… माझी बर्फी, माझी मनी माऊ ती…


हो मी आहेच गोड, म्हणजे मला डायबिटीस (शुगर) आहे. चॉकलेट खायचं नाही, लॉलीपॉप खायचं नाही, गोड-गोड शिरा सुद्धा खायचा नाही.


सगळेजण हे खातात.,,,माझ्या शाळेतल्या मैत्रिणी सुद्धा खातात… फक्त मीचं खायचं नाही. नुसतेच म्हणे माझी गोडूली, मला कधी कधी आईचा खूप-खूप राग येतो.


पण एक सांगू का, आई असली ना की मला काही काही नको असतं…. चॉकलेट नाही, लॉलीपॉप नाही बर्फी सुद्धा नाही. आई आणि मी खूप खेळतो, चित्रं काढतो, बागेत फिरतो आणि पाण्यात सुद्धा खेळतो. आणि मग कश्याची आठवण सुद्धा येत नाही.


पण कधीतरी कुठल्यातरी कारणानें चॉकलेट-लॉलीपॉपशी गाठ पडायची ती पडतेचं. त्याचं ते चकचकीत मस्तं कव्हर बघून तोंडाला पाणी सुटतं,,,, पण… आईने सांगितलंय ना, बाहेरचं काहीही आईला विचारल्याशिवाय खायचं नाही म्हणून. पोटात खूप दुखतं… आणि मला त्रास झाला की आईला पण खूप त्रास होतो, रात्री जागावं पण लागतं. म्हणून मी नाही खात.


एकदा कधीतरी खाली पडलेलं चॉकलेटचं कव्हर दिसलं, आजूबाजूला कोणी नाहीना हे आधी नीट पाहून मग हळूच दबक्या पावलांनी ते उचललं आणि खिशात घालून घरी आणलं.


किती आनंद झाला होता मला..


मस्तंच, त्या चॉकलेटच्या कव्हरकडे पहातच झोपुन गेले त्या बाबांच्या मोबाईलमधल्या गाण्यातल्या सारख… चॉकलेटच्या दुनियेत
असावा सुंदर, चॉकलेटचा बंगला..
चंदेरी-सोनेरी चमचमता चांगला…
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार…


तेवढ्यात, आईने उठवलं.. स्वप्नातून बाहेर आले आणि चॉकलेट चं कव्हर हातातून पटकन टाकून दिलं.
आईने ते बघितलं पण काहींच नाही म्हणाली.
आईने मग जवळ घेत मला सांगितलं, “घट्ट डोळे मिट बरं”..
आणि काय गंम्मत झाली माहितीये, आईने माझ्या हातात खर्र-खुरं चॉकलेट ठेवत मला म्हटलं, “आत्ता माझा बाळाची शुगर कमी आहे म्हणून माझी गोडूली हे चॉकलेट खाऊ शकते”
तशी मी तिला घट्ट मिठी मारत आनंदानं ओरडले….
“ए आई तू माझीयेश ना गं!!!”
-सुनीता बांगर-आचार्य

Photo Credit: dr_swapnil_photography

Marathi
Leave a Response